चाळीसगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

0
34

जळगाव समाचार डेस्क | १५ सप्टेंबर २०२४

चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर पिंपरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शनिवारी दिनांक १४ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत मुलाचे नाव रिंकेश नंदू मोरे असे आहे. रिंकेश आपल्या काही मित्रांसोबत गणेशपूर-पाटण रस्त्यावर रनिंगसाठी गेला होता. चार मित्र धावत पुढे गेले असताना, रिंकेश मागे राहिला. याचवेळी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला आणि त्याला ओढत शेतात नेले.

रिंकेशच्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा शोध लागला नाही. घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच वनविभागाला कळविण्यात आले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांनी वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here