जळगाव समाचार | २९ मार्च २०२६
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे पती-पत्नीने एकाच झाडाला एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतांची नावे भगवान पोपट जाधव (वय ३८) आणि आशाबाई भगवान जाधव (वय २७) अशी आहेत. हे दाम्पत्य शिवापूर शिवारातील आपल्या शेतात वास्तव्यास होते. भगवान जाधव हे शेतीसोबत मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अत्यंत साध्या परिस्थितीत संसाराचा गाडा ओढत असताना त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
शुक्रवारी मध्यरात्री किंवा शनिवारी पहाटेच्या सुमारास, घरापासून काही अंतरावर असलेल्या उंबराच्या झाडाला दोघांनी एकाच दोरीने गळफास घेतला. शनिवारी सकाळी नातेवाईक नेहमीप्रमाणे शेतात गेले असता हे दोघे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. नातेवाइकांनी तातडीने दोघांना खाली उतरवून चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन लहान मुले असून ती शिक्षणासाठी बाहेरगावी राहत असल्याने घटनेवेळी घरी उपस्थित नव्हती. आई-वडिलांच्या या टोकाच्या निर्णयामुळे दोन्ही मुले पोरकी झाली असून त्यांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घरगुती वाद, आर्थिक अडचणी किंवा अन्य कोणते कारण याबाबत पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

![]()




