जळगाव समाचार डेस्क| १९ ऑगस्ट २०२४
चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावात रविवारी सायंकाळी एक दु:खद घटना घडली, ज्यामध्ये डोंगरी नदीच्या बंधाऱ्यात बुडून चार सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये तीन बहिणी आणि एक भाऊ यांचा समावेश आहे. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशीच भावा-बहिणींचा असा अकाली मृत्यू ओढवल्याने गावात शोककळा पसरली आहे.
उदय सुधाकर अहिरे यांच्या शेतात सेंधवा येथील सुभानिया देवचंद आर्य हे पत्नीसह शेतात सालदारकीचे काम करतात. त्यांच्या कुटुंबात पाच मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. रविवारी सायंकाळी, आर्य कुटुंबातील शिवांजली सभानिया आर्य (वय ६ वर्षे), रोशनी सुभानिया आर्य (वय ९ वर्षे), आराध्या सुभानिया आर्य (वय ४ वर्षे), आणि आर्यन सुभानिया आर्य (वय ५ वर्षे) हे चारही भावंडं शेताजवळील केटी वेअर बंधाऱ्याजवळ खेळत होते.
खेळताना अचानक यापैकी तीन बहिणी आणि त्यांचा भाऊ पाण्यात पडले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू लागले. यावेळी त्यांच्या मोठ्या बहिणीने हा प्रकार पाहून आरडाओरड केली, ज्यामुळे गावकरी घटनास्थळी धावले. तातडीने मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आणि ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदार करंबेळकर यांनी चौघांनाही मृत घोषित केले.
काही तासांपूर्वी शेतात बागडणाऱ्या मुलांचे मृतदेह पाहून कुटुंबीयांमध्ये एकच आक्रोश उडाला. शिवांजली, रोशनी, आराध्या, आणि आर्यन यांच्या अकस्मात मृत्यूमुळे गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशीच हा दुर्दैवी प्रसंग घडल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
या घटनेची नोंद चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संदीप पाटील आणि उपनिरीक्षक लोकेश पवार यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास सुरू आहे.
या ह्रदयद्रावक घटनेने गावातील लोकांच्या मनात खोलवर आघात केला आहे. यापुढे अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून गावकऱ्यांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

![]()




