छगन भुजबळ पुन्हा मंत्रिपदावर; दीर्घ प्रतीक्षेनंतर महायुती सरकारमध्ये प्रवेश…


जळगाव समाचार | २० मे २०२५

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ अखेर पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत. आज (२० मे) त्यांनी राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या मंत्रिपदावर भुजबळांची वर्णी लागली आहे.

मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळ काही काळ नाराज होते. त्यांच्या समर्थकांमध्येही नाराजीचं वातावरण होतं. मात्र, अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्याने त्यांनी राजीनामा दिला आणि त्या जागी भुजबळ यांची नियुक्ती झाली.

छगन भुजबळ यांची कारकीर्द राज्याच्या राजकारणात बहुआयामी राहिली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यापासून ते उपमुख्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास उल्लेखनीय आहे. ते सध्या येवला मतदारसंघातून आमदार आहेत.

यापूर्वी ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (१९९९-२००३), गृहमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा आता महायुती सरकारला होणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भुजबळांच्या मंत्रिपदामुळे ओबीसी समाजात समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून, त्यांच्या पुढील भूमिकेकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here