जळगाव समाचार | १० मे २०२५
भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांनी तात्काळ युद्धविराम (सीजफायर) लागू करण्यास सहमती दर्शवली आहे. ही माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली असून, हा निर्णय अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक पोस्ट करत सांगितले की, “भारत आणि पाकिस्तान यांनी युद्धविरामाला मान्यता दिली आहे आणि हा निर्णय तात्काळ लागू होणार आहे.”
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनीसुद्धा याची अधिकृत पुष्टी केली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, १२ मे रोजी दोन्ही देशांचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स (DGMO) यांच्यात यासंदर्भात पुढील चर्चा होणार आहे.
तणावाची पार्श्वभूमी
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या एका भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. भारताने या हल्ल्याला पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननेही हल्ले केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आणखी वाढला.
या गंभीर परिस्थितीत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याशी चर्चा केली. ट्रम्प यांनी दोन्ही देशांचे कौतुक करत सांगितले, “भारत आणि पाकिस्तान यांनी शांततेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.”
भारताची भूमिका काय आहे?
भारत सरकारने युद्धविरामाचे स्वागत केले आहे. मात्र, अधिकृत निवेदन अद्याप प्रसिद्ध झालेले नाही. भारताने स्पष्टपणे सांगितले आहे की, युद्धविरामाच्या निर्णयाचा आदर करतानाही दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई सुरूच ठेवली जाईल.
हा युद्धविराम हा भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये शांततेच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पुढील काही दिवसांत दोन्ही देशांमध्ये अधिकृत चर्चा, बैठका आणि निर्णय होत राहतील. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या घडामोडींवर राहणार आहे.