जळगाव समाचार | २१ एप्रिल २०२५
फ्रान्समध्ये १४ ते २२ मे दरम्यान होणाऱ्या प्रतिष्ठित कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा चार मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. यामध्ये ‘स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’, ‘खालिद का शिवाजी’ यांचा समावेश आहे, तर ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची विशेष निवड करण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली.
या चित्रपटांची निवड महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत करण्यात आली असून, यासाठी तज्ज्ञांची समिती तयार करण्यात आली होती.
‘स्थळ’ – पारंपरिक अरेंज मॅरेज, पितृसत्ताक समाजव्यवस्था आणि रंगभेद यावर भाष्य करणारा चित्रपट. जयंत सोमलकर यांनी दिग्दर्शित केला असून, नंदिनी चिकटे मुख्य भूमिकेत आहेत. प्रस्तुतकर्ते – सचिन पिळगांवकर.
‘स्नो फ्लॉवर’ – रशिया आणि कोकण या दोन भिन्न संस्कृतींमधली कथा. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित या चित्रपटात विठ्ठल अहिरे, छाया कदम, वैभव मांगले, सरफराज आलम सफू यांच्या भूमिका आहेत.
‘खालिद का शिवाजी’ – मुस्लिम मुलगा ‘खालिद’ शिवाजी महाराजांचा शोध घेतो, ही अनोखी कथा राज मोरे यांनी दिग्दर्शित केली आहे.
‘जुनं फर्निचर’ – वृद्धापकाळातील भावनिक संघर्षावर आधारित. महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित व अभिनय केलेला हा चित्रपट असून, भूषण प्रधान, मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर, विजय निकम, डॉ. गिरीश ओक आदी कलाकार भूमिका साकारत आहेत.
मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावे, यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचे मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले.