Sunday, December 22, 2024
Homeजळगावपिंपळे फाट्याजवळ बसचा भीषण अपघात: एक ठार, २१ प्रवासी जखमी…

पिंपळे फाट्याजवळ बसचा भीषण अपघात: एक ठार, २१ प्रवासी जखमी…


जळगाव समाचार डेस्क | १४ डिसेंबर २०२४

जिल्ह्यात अपघातांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र आहे. नुकताच धरणगाव-चोपडा रस्त्यावरील पिंपळे फाट्याजवळ भीषण अपघात घडला. शनिवारी (दि. १४) सकाळी सहा वाजता झालेल्या या अपघातात एक प्रवासी ठार तर २१ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चोपडा मार्गे जळगावहून शिरपूरला जाणारी एसटी बस (क्रमांक एमएच १४ बीटी ३९१०) पिंपळे गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला (क्रमांक एमएच १९ ईजी ३९५२) भरधाव वेगाने धडकली. धडक इतकी भीषण होती की, बसचा पुढील भाग पूर्णतः चिरडला गेला. या अपघातात २१ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. बसचालकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

जखमींमध्ये जाकीर शब्बीर खाटीक (३५, पिंप्री), शब्बीर रहे मुल्ला खाटीक (६५, पिंप्री), गंगाराम आनंदा बाविस्कर (६८, पिंप्राळा), प्रमिला ईश्वर सोनवणे (५०, जळगाव), अनिश हनीफ शेख (३८, चोपडा), सागर विठ्ठल पाटील (२८, रोटवद), भगवान सुपडू पाटील (७५, पिंपळे सिम), जयश्री गणेश मराठे (४५), शरद बिलाडिया पारधी (४०, नंदुरबार), विमल रमेश मराठे (६५, नळयात), रमेश सोनू मराठी (७५), कमलबाई काशिनाथ मराठे (७५), वरुड प्रवीण भगवान कुंभार (२४, गोरगाव), ज्योती योगेश पाटील (३८, साळवा), सुषमा कपिल सिंग बयास (३६, धरणगाव), मेघना कपिलसिंग बयास (७, धरणगाव), योगेश दिगंबर पाटील (३६, धरणगाव), सुनील रामसिंग अलकारी (५८, जळगाव), अनिता सुनील अलकारी (५२, जळगाव), नंदा वसंत बाविस्कर (३३, साळवा) आणि व्ही.व्ही. इंगोले (४०, जळगाव) यांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक पवन दिसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने वाहतूक सुरळीत करून जखमींना रुग्णालयात पोहोचवले. मात्र, या घटनेची नोंद अद्याप पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नाही.

अपघाताची माहिती मिळताच जखमी प्रवाशांच्या नातेवाईकांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. या अपघातांमुळे सार्वजनिक वाहतुकीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी योग्य चौकशी करून भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page