मनमाड, जळगाव समाचार डेस्क;
राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यात भरीस भर आज एक मोठ्या घटनेत मनमाड शहरापासून जवळ असलेल्या दहेगाव परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे 35 प्रवासी असलेल्या महामंडळाची बस उलटल्याची घटना घडली आहे. या घटनेत आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.
दरम्यान घटनेबाबत प्राप्त माहितीनुसार, पुणे – दोंडाईचा ही बस (MH14, BT 2371) सुमारे ३५ प्रवाशांना घेऊन दोंडाईचाकडे जात होती. मनमाड बसस्थानक सोडल्यानंतर पुणे-इंदूर महामार्गावर दहेगाव शिवारात बसला भीषण अपघात झाला. दरम्यान यावेळी प्रवाशांच्या आक्रोशाने परिसर दणाणून गेला. गावकर्यांनी जखमींना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी हालचाल केली. अपघातात चैतन्य मनोज शर्मा (रा. नंदुरबार), शिवाजी गोरख पाटील (अमळनेर), शोभा रमेश भोई, मीना मदनलाल पुराविया (अहमदनगर), मीनाबाई पाटील (अमळनेर) यांच्यासह इतर काही प्रवासी जखमी झाले आहेत.