जळगाव समाचार | २५ नोव्हेंबर २०२५
जळगाव जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पेट्रोल पंपासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून १५,००० रुपयांची लाच स्वीकारताना PWD चा आरेखक वासुदेव धोंडू पाथरवट (वय ५३, रा. विश्वकर्मा भवन, मोहीत नगर, भुसावळ) याला धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. तक्रारदाराने जामनेर तालुक्यातील वाकडी येथे पेट्रोल पंपासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अभिप्राय मागवला होता. मात्र, काम लवकर करून देण्यासाठी पाथरवट यांनी सुरुवातीला २,००० आणि काम झाल्यावर १५,००० रुपये देण्याची मागणी केली होती.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर प्रथम पडताळणी करण्यात आली आणि त्यानंतर पाथरवट यांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान पाथरवट यांनी १५ हजारांची मागितलेली रक्कम स्वीकारली आणि त्याच वेळी त्यांना पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल तसेच हलावदार राजन कदम, प्रवीण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागूल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सागर शिर्के, प्रीतेश चौधरी, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे आणि जगदीश बडगुजर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यातच दीपनगर औष्णिक वीज केंद्रातील अधीक्षक अभियंत्याविरोधात पाच हजारांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागातील ही नवी कारवाई उघड झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. नागरिकांसाठी लाचखोरीविरोधात तक्रार प्रक्रिया आणखी सोपी व्हावी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ७५८८६६१०६४ हा WhatsApp क्रमांक कायमस्वरूपी सुरू करण्यात आला असून, या क्रमांकावर थेट संपर्क साधून नागरिकांना भ्रष्टाचारासंबंधी तक्रार नोंदवता येणार आहे. हा क्रमांक पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या ताब्यात कार्यान्वित राहणार आहे.

![]()




