धरणगाव भ्रष्ट अधिकाऱ्यांचा अड्डा; आता ग्रामसेवकाला २५ हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक…

जळगाव समाचार | २२ मार्च २०२५

धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील ग्रामविकास अधिकारी नितीन भीमराव ब्राम्हणे (वय ३७, रा. खर्दे बुद्रुक) यांनी गावातील गटार आणि इतर बांधकामाच्या बिलासाठी १० टक्के प्रमाणे २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावने रंगेहाथ अटक केली.

तक्रारदाराने आपल्या गावात २ लाख ७० हजार रुपयांची गटारीची व इतर बांधकामे केली होती. त्या कामांचे बिल काढण्यासाठी ग्रामसेवक नितीन ब्राम्हणे यांनी १,९५,००० व ६९,००० असे दोन धनादेश मंजूर केले. एकूण २ लाख ६४ हजार रुपये तक्रारदाराच्या खात्यात जमा करण्यात आले.

बिले मंजूर करून देण्यासाठी ब्राम्हणे यांनी तक्रारदाराकडे कामाच्या रकमेच्या १० टक्के प्रमाणे २७ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर ही रक्कम २५ हजारांवर ठरवली आणि ती तातडीने आणून देण्यास सांगितले.

तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार शनिवार, दिनांक २२ रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने ग्रामसेवकाला २५ हजार रुपये देण्यासाठी बोलावले. लाच घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ग्रामसेवक ब्राम्हणे यांना रंगेहाथ अटक केली.

या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश पाटील, किशोर महाजन, अमोल सूर्यवंशी यांनी सापळा रचून ही कारवाई यशस्वी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here