भूमी अभिलेख कार्यालयाचा भूकरमापक ४ हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात…

 

जळगाव समाचार | २७ मार्च २०२५

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत रावेर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकाला ४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. एरंडोल तालुक्यातील निंभोरा येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी भूकरमापकाने शेतजमिनीच्या मोजमापाच्या खुणा दाखवण्यासाठी लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ४ हजार रुपयांवर लाच निश्चित करण्यात आली. अखेर, लाच घेताना ACBच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मस्कावद (ता. रावेर) येथील ३० वर्षीय शेतकऱ्याची आणि त्यांच्या काकांची मस्कावद येथे सामायिक शेतजमीन आहे. या जमिनीच्या मोजमापासाठी त्यांनी ७ जानेवारी २०२५ रोजी भूमी अभिलेख कार्यालय, रावेर येथे अर्ज केला होता. त्यानुसार, १८ फेब्रुवारी २०२५ रोजी भूकरमापक राजेंद्र रमेश कुलकर्णी (वय ४८) यांनी शेताचे मोजमाप केले.

मात्र, मोजमापाच्या खुणा दाखवण्यासाठी त्यांनी ५,५०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने पैसे देण्यास नकार दिल्यावर भूकरमापकाने “हरभऱ्याच्या स्वरूपात लाच दे,” अशी मागणी केली. मात्र, तक्रारदाराला हे मान्य नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

दरम्यान, तक्रार मिळाल्यानंतर ACB ने संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केली. त्यावेळी भूकरमापक कुलकर्णी यांनी लाचेची रक्कम कमी करत प्रथम ५,५०० रुपयांवरून ५,००० आणि नंतर ४,००० रुपयांवर तडजोड केली. यानंतर, ACB ने त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी नियोजनबद्ध सापळा रचला.

दरम्यान, काल दि. २६ मार्च २०२५ रोजी तक्रारदाराने भूकरमापकास निंभोरा येथे एका शेताजवळ ४,००० रुपये दिले. पैसे स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कुलकर्णी याला रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलीस हवालदार राकेश दुसाने आणि पोलीस हवालदार अमोल सूर्यवंशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी करण्यात आली. या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here