जळगाव समाचार डेस्क
बदलापूर येथील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांच्या गोळीबारात ठार झाल्याची बातमी समोर आली आहे. आज पोलिसांनी तळोजा कारागृहातून अक्षय शिंदेला बदलापूर पोलिस ठाण्याकडे नेत असताना त्याने पोलिसांकडून बंदूक हिसकावून गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केल्याने अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला होता.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, गोळी शिंदेच्या डोक्याला लागली असून त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र यावेळी त्याचा मृत्यू झाला. या गोळीबारात एक पोलिस अधिकारी देखील जखमी झाला असून त्यांची प्रकृतीही गंभीर आहे.
अक्षय शिंदे याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेत शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याला 17 ऑगस्ट रोजी अटक केली होती.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. आरोपीने स्वतःवर आणि पोलिसांवर गोळीबार का केला याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.