जळगाव समाचार डेस्क | ३ जानेवारी २०२५
इंजिनिअरिंगमध्ये वारंवार नापास झाल्यामुळे संतापलेल्या एका मुलाने आई-वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या कपिलनगर परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरून गेले आहे.
लीलाधर डाखोळे (वय ५२) आणि अरुणा डाखोळे (वय ४८) असे मृत दांपत्याचे नाव आहे. आरोपी उत्कर्ष लीलाधर डाखोळे (वय २४) हा त्यांचा मुलगा असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
लीलाधर डाखोळे हे कोराडी वीज केंद्रात टेक्निशियन होते, तर अरुणा डाखोळे या शिक्षिका होत्या. त्यांचा मुलगा उत्कर्ष इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होता, तर मुलगी सेजल बीएएमएसच्या पहिल्या वर्षाला शिकते. उत्कर्ष गेल्या दोन वर्षांपासून वारंवार नापास होत होता, यामुळे त्याच्या आई-वडिलांनी त्याला शेती किंवा दुसऱ्या कोर्समध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला होता.
२५ डिसेंबर रोजी वडिलांनी त्याला इंजिनिअरिंग सोडून शेती करण्याचा किंवा आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला देत थोडी झापाझाप केली. त्याच वेळी आईने त्याची बॅग भरून ठेवली होती. या सगळ्यामुळे उत्कर्ष खूप अस्वस्थ झाला.
२६ डिसेंबर रोजी, आई विद्यार्थ्यांचे पेपर तपासत होती. उत्कर्षने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर वडील घरी आले असता, त्यांनी पत्नी मृतावस्थेत पाहून धक्का बसला. ते सोफ्यावर बसलेले असताना उत्कर्षने चाकूने त्यांच्या मानेवर वार करून त्यांचाही खून केला.
नववर्षाच्या दिवशी, लीलाधर यांच्या एका मित्राने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी भेट दिली. घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. कपिलनगर पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, त्यांना लीलाधर आणि अरुणा यांचे मृतदेह सापडले.
दरम्यान पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच चौकशीत उत्कर्षने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी सांगितले की, उत्कर्षला एमडी ड्रग्जचे व्यसन होते, त्यामुळे त्याचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. त्याच नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलले.
या दुहेरी हत्याकांडामुळे नागपूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीवर कपिलनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.