जामनेर, जळगाव समाचार डेस्क;
तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत शिवारात 18 वर्षीय युवकाचा शेतात विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धीरज नारायण पवार असे मयत युवकाचे नाव असून तो टाकळी येथील रहिवासी होता.
याबाबत सविस्तर वृत असे कि, धीरज हा 12वीत शिक्षण घेत होता, मात्र घरातील परिस्थितीमुळे आई वडिलांना आधार म्हणून तो श्रीधर झावरु यांच्या शेतात खत टाकायसाठी गेला. खत टाकून झाल्यानंतर तो लोखंडी कडी पकडून आंघोळीसाठी विहिरीतून पाणी काढत होता, याच दरम्यान त्याच्या हातातील कडी सुटली आणि तो खोल विहिरीत जाऊन पडला. त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला आणि त्याचा करून अंत झाला. दरम्यान धीरज पाण्यात बुडाल्याचे लक्षात येतात विहिरी शेजारी उभे असलेल्या सहकार्याने आरडाओरड केली. इतर लोक धावून येईपर्यंत धीरज पाण्याखाली गेला होता.
तीन तासांनंतर मृतदेह बाहेर…
तीन तासांच्या प्रयत्नानंतर धीरज याचा मृतदेह खोल विहिरीतून बाहेर काढता आला. याप्रकरणी तलाठी मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळावर जाऊन स्पॉट पंचनामा केला असून जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याचा पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे. त्याच्या अकाली निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.