जळगाव समाचार | ७ एप्रिल २०२५
आजचा (७ एप्रिल) दिवस शेअर बाजारासाठी काळा सोमवार ठरला. बाजार सुरू होताच सेन्सेक्स तब्बल ३ हजार अंकांनी घसरला आणि ७२,३०० च्या खाली आला. तर निफ्टीही १,१०० अंकांनी घसरून २१,७६० च्या खाली गेला. यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे १९ लाख कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले.
या घसरणीमागे अमेरिकेने व्यापार शुल्क (Trump Tariffs) वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे जगभरात निर्माण झालेला व्यापार तणाव आणि मंदीची भीती कारणीभूत ठरली आहे. अमेरिकेच्या निर्णयानंतर जागतिक बाजारात घसरण सुरू झाली आणि भारतालाही त्याचा मोठा फटका बसला.
कोणते शेअर्स सर्वाधिक घसरले?
• टाटा मोटर्स – ९.८%
• टाटा स्टील – ९.६%
• एचसीएल टेक – ७%
• एल अँड टी – ६.७%
• टेक महिंद्रा, इन्फोसिस, रिलायन्स, अदानी पोर्ट्स – प्रत्येकी सुमारे ५%
क्षेत्रीय घसरणही मोठी
• निफ्टी मेटल – ८%
• निफ्टी आयटी – ७%
• ऑटो व रियल्टी – ५% पेक्षा जास्त
• मिडकॅप – ४.६%
• स्मॉलकॅप – ६%
जगभरातील बाजारातही हाच ट्रेंड पाहायला मिळाला. अमेरिकेचा डाऊ जोन्स, एस अँड पी आणि नॅस्डॅक हे निर्देशांक शुक्रवारीच घसरले होते. सोमवारी आशियाई बाजारांमध्येही मोठी घसरण झाली. जपान, हाँगकाँग, चीन आणि दक्षिण कोरियाचे बाजारही जोरात घसरले.
गुंतवणूकदारांनी सध्या सतर्क राहणं गरजेचं असून बाजारातील घडामोडीवर लक्ष ठेवावं, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.