Monday, December 23, 2024
Homeजळगावविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात दीड कोटींची रोकड पोलिसांच्या ताब्यात…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात दीड कोटींची रोकड पोलिसांच्या ताब्यात…


जळगाव समाचार डेस्क | २४ ऑक्टोबर २०२४

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेची अंमलबजावणी आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यांच्या सीमेवर वाहनांची कसून तपासणी सुरू असून, अवैध दारू, रोख रक्कम यांचा शोध घेतला जात आहे. या तपासणीदरम्यान, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि एरंडोल तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली आहे. या घटनांनी परिसरात खळबळ उडाली आहे.

अमळनेर तालुक्यात १६ लाख ३८ हजारांची रोकड जप्त
अमळनेर तालुक्यातील चोपडाई तपासणी नाक्यावर, पोलीस तपासणी दरम्यान एका वाहनात १६ लाख ३८ हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अमळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तपासणी पथकाच्या मदतीने कारवाई केली. या रोख रकमेचा पंचनामा उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, आणि मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. दहा लाख रुपयांहून अधिक रक्कम असल्याने ती आयकर विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. या रकमेबाबत प्राथमिक माहिती अशी की, ती एक कापूस व्यापाऱ्याची असल्याचे सांगितले जात आहे.

एरंडोल तालुक्यात कासोदामध्ये दीड कोटींची रक्कम जप्त
दुसरीकडे, एरंडोल तालुक्यातील कासोदा गावात पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान एका कारमधून तब्बल दीड कोटी रुपयांची रोकड जप्त केली. कासोदा गावातील फरकांडे चौफुलीवर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी एका क्रेटा कारची तपासणी केली असता, त्यामध्ये एक कोटी ४५ लाख रुपयांची रोकड सापडली. पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली असून, ती नेमकी कोणाची आहे आणि कशासाठी वापरण्यात येणार होती याचा तपास सुरू आहे.

पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू
दोन्ही घटनांमुळे निवडणूक काळात पैशांचा अवैध वापर रोखण्याबाबत प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत. कासोदा आणि अमळनेर या दोन्ही ठिकाणच्या जप्त केलेल्या रकमेबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, या रकमेचा पुढील वापर निवडणूक प्रक्रियेत गैरवापरासाठी करण्यात आला होता का, याचा शोध घेतला जात आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page