बिलवाडी खून प्रकरणी संतप्त ग्रामस्थांचा जळगावात रास्तारोको

 

जळगाव समाचार | १५ सप्टेंबर २०२५

तालुक्यातील बिलवाडी येथे जुन्या वैमनस्यातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीत एकनाथ गोपाळ (५५, रा. बिलवाडी) यांचा मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत मृताच्या नातेवाईकांसह संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी जळगाव शहरातील आकाशवाणी चौक येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. तसेच त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना निवेदन सादर केले.

बिलवाडी येथे गोपाळ आणि पाटील या दोन कुटुंबांमध्ये अनेक वर्षांपासून तणावाचे संबंध होते. शनिवारी रात्री गोपाळ कुटुंबातील एका सदस्याची दुचाकी पाटील कुटुंबातील काही तरुणांनी अडवल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर रविवारी दुपारी एकनाथ गोपाळ व त्यांच्या कुटुंबीयांनी ग्रामपंचायतीच्या बांधकामावर रोजगारासाठी हजेरी लावली असता, पाटील कुटुंबातील काही सदस्य तेथे आले. पुन्हा वाद सुरू झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या संघर्षात फावडे, लाकडी दांडे व इतर बांधकाम साहित्य वापरण्यात आले.

हाणामारीत एकनाथ गोपाळ यांचा जागीच मृत्यू झाला. त्याशिवाय दोन्ही कुटुंबांतील एकूण ११ जण जखमी झाले. जखमींमध्ये किरण पाटील (२८), मिराबाई पाटील (४५), ज्ञानेश्वर पाटील (४०), दीपक पाटील (२३), संगीता पाटील (४०), जनाबाई गोपाळ (५५), एकनाथ गोपाळ (३५), गणेश गोपाळ (२३), भीमराव गोपाळ आणि कमलेश पाटील (२६) यांचा समावेश आहे. जखमींवर जळगाव आणि परिसरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत आठ संशयितांना ताब्यात घेतले असून, इतर दोन आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी ग्रामस्थांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले. घटनास्थळी तणाव निर्माण झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

मृताच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी रुग्णालय परिसरात काही काळ गोंधळ घातला होता. दोषींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर सोमवारी त्यांनी जळगाव शहरातील आकाशवाणी चौकावर रास्तारोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here