जळगाव समाचार | १८ एप्रिल २०२५
यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात दोन वर्षांच्या बालिकेवर हल्ला करून तिचा जीव घेणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या सापळ्यात अडकला आहे. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना वन विभागाने वेळीच पाऊल उचलत बिबट्याला जेरबंद केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून किनगाव-डांभुर्णी परिसरात बिबट्याचा वावर वाढला होता. काही आठवड्यांपूर्वी एका बालकाचा बळी गेल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच रत्ना रूपनर या दोन वर्षांच्या बालिकेवर बिबट्याने झडप घालून तिचा मृत्यू ओढवला होता. या घटनेनंतर आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी वन खात्याला तातडीने कारवाईचे आदेश दिले होते.
त्यानुसार काल रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. त्याला बेशुद्ध करणारे इंजेक्शन देण्यात आले असून, बिबट्याला नागपूर जिल्ह्यातील बोरगावच्या घनदाट जंगलात सोडण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी वन विभागाच्या या कार्यवाहीचे स्वागत केले आहे.