जळगाव समाचार डेस्क। १४ ऑगस्ट २०२४
तळोदा तालुक्यातील चिनोदा शेतशिवारात घडलेल्या धक्कादायक घटनेत, बिबट्याने एका 10 वर्षीय मुलावर हल्ला करून त्याचा मृत्यू केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर, राखणदार आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिनोदा येथील रहिवासी पुण्या जेहऱ्या पाडवी (आजोबा) आणि त्यांचा नातू कार्तिक राजेश पाडवी (वय 10) हे दि. 13 ऑगस्ट रोजी आपल्या गुरांना चारा काढण्यासाठी शेतात गेले होते. चारा कापत असताना अचानक बिबट्याने कार्तिकवर हल्ला चढवला आणि त्याच्या गळ्याला आणि मानेला चावा घेतला. या भयंकर हल्ल्यात कार्तिक पाडवी याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच तळोदा वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. चिनोदा आणि परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने स्थानिक शेतकरी, शेतमजूर, राखणदार, आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने कारवाई करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.