भूषण गवई देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; राष्ट्रपती मुर्मु यांनी दिली पदाची शपथ…

जळगाव समाचार | १४ मे २०२५

न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आज (१४ मे) देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ते या पदावर नियुक्त होणारे पहिले बौद्ध व्यक्ती आहेत. त्यांचा कार्यकाळ ६ महिने आणि ९ दिवसांचा असणार आहे.

न्यायमूर्ती गवई हे सरन्यायाधीशपदावर पोहोचणारे अनुसूचित जातीतील दुसरे व्यक्ती आहेत. याआधी न्यायमूर्ती के. जी. बालकृष्णन यांनी २००७ मध्ये हे पद भूषवले होते.

भूषण गवई यांचा जन्म अमरावती येथे २४ नोव्हेंबर १९६० रोजी झाला. त्यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई हे आंबेडकरी चळवळीतील नेते होते आणि बिहार, सिक्कीम व केरळचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सामाजिक पार्श्वभूमीत वाढलेले गवई यांनी १९८५ मध्ये वकिली सुरु केली. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात तसेच नागपूर खंडपीठात यशस्वी वकिली केली. २०१९ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.

न्यायमूर्ती गवई यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, निवृत्तीनंतर ते कोणतेही पद स्वीकारणार नाहीत. त्यांनी संविधानाचे सर्वोच्चत्व मान्य करत काम करण्याची भूमिका मांडली आहे. त्यांच्या आई कमलताई गवई यांनीही विश्वास व्यक्त केला की, भूषण गवई संविधानाच्या मूल्यांनुसार सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांची जपणूक करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here