दीपनगर औष्णिक वीज केंद्राच्या अधीक्षक अभियंत्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा…

जळगाव समाचार | २१ नोव्हेंबर २०२५

जळगाव जिल्ह्यातील दीपनगर येथील महावितरणच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रात गुरुवारी मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधीक्षक अभियंत्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भानुदास पुंडलिक लाडवंजारी (५७) यांनी तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. तक्रारदार हे एका कंपनीतर्फे २१० मेगावॅट क्षमतेच्या प्लान्टवर साईट सुपरवायझर म्हणून कार्यरत असून, त्यांच्याकडून देयक मंजूरीसाठी लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.

सदर कंपनीने २८ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत प्लान्टच्या तळाशी जमा होणारी राख उचलण्यासह मोडतोड कामे, तेलाचे बॅरल काढणे आणि वाहतूक या सेवांसाठी दोन लाख २८ हजार ५४४ रुपयांचे बिल बीटीपीएस विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे सादर केले होते. हे बिल मंजूर करून देण्यासाठी लाडवंजारी यांनी एकूण देयकाच्या पाच टक्के तडजोडीअंती पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत २९ एप्रिल २०२५ रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली. पंचांच्या उपस्थितीत पडताळणी केली असता लाडवंजारी यांनी पाच हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हीकारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, हवालदार किशोर महाजन, बाळू मराठे, अमोल सुर्यवंशी, प्रणेश ठाकूर व भूषण पाटील यांच्या पथकाने यशस्वीपणे पूर्ण केली.

दरम्यान, नागरिकांना लाच मागणी किंवा इतर भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार नोंदवणे सोपे व्हावे म्हणून ७५८८६६१०६४ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केला आहे. हा क्रमांक थेट पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्याकडे असल्याने नागरिकांना कोणत्याही अडथळ्याविना त्यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here