भुसावळ नगरपरिषद निवडणूक : मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही भाजपचा पराभव, राष्ट्रवादीच्या गायत्री भंगाळे-गौर विजयी

जळगाव समाचार | २१ डिसेंबर २०२५

जिल्ह्यातील नगर परिषदांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतरही भाजपच्या उमेदवार तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनी सावकारे यांचा तब्बल १,८०० हून अधिक मतांनी पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या गायत्री भंगाळे-गौर यांनी निर्णायक विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले.

लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचा हा भुसावळमधील पहिलाच प्रयोग असल्याने निवडणूक जाहीर झाल्यापासून शहरातील राजकीय वातावरण तापले होते. नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला (एससी) प्रवर्गासाठी राखीव झाल्याने निवडणूक अधिकच लक्षवेधी ठरली. या पार्श्वभूमीवर भाजपने रजनी सावकारे यांना उमेदवारी दिली होती; मात्र या निर्णयावर घराणेशाही व सत्तेच्या गैरवापराचे आरोप करत विरोधकांनी जोरदार टीका केली. त्यामुळे संपूर्ण प्रचारकाळात रजनी सावकारे यांची उमेदवारीच चर्चेचा केंद्रबिंदू ठरली.

निवडणुकीच्या सुरुवातीला भाजपचे काही नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता. शहरात भाजपचे वर्चस्व अधिक बळकट होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते आणि बिनविरोध निवडींमुळे विरोधकांवर मानसिक दबाव निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र प्रत्यक्ष मतदानात हे गणित पूर्णतः बदलल्याचे निकालातून स्पष्ट झाले.

दरम्यान, विरोधकांकडून उमेदवार जाहीर करण्याबाबत शेवटपर्यंत सस्पेन्स कायम ठेवण्यात आला होता. अखेर माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने लेवा पाटीदार समाजाच्या गायत्री भंगाळे-गौर यांना उमेदवारी दिली. त्यांनी विकास, पारदर्शक कारभार, सामाजिक समता आणि शहराच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत प्रचार केला. घराणेशाही विरुद्ध परिवर्तन आणि सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी प्रतिष्ठेची लढाई ठरलेली ही निवडणूक भुसावळच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here