जळगाव समाचार | २७ मे २०२५
भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे भारतात प्रवेशासाठी कोणतेही वैध कागदपत्र नव्हते. तसेच, त्यांच्या जवळ बनावट आधार कार्ड सापडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील तानिया अहमद (वय 26) आणि करीमा अख्तर (वय 22) या दोन महिला भारतात रेल्वेमार्गे आल्या होत्या. भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरल्यावर, त्या शहरातील जामनेर रोडवरील ‘हॉटेल अतिथी’मध्ये थांबण्यासाठी गेल्या. तेथे आधार कार्ड मागितल्यावर त्यांनी झेरॉक्स कॉपी दाखवली. ओरिजिनल मागितल्यावर ते देऊ शकल्या नाहीत, त्यामुळे संशय वाढला.
पोलिसांनी चौकशी केली असता, त्या मुंबईतील एका ‘दीदी’कडे कामासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तपासात जलाल व सैफुल या दोघांनी त्यांना बनावट आधार कार्ड मिळवून दिल्याचे उघड झाले.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक राहुल वाघ आणि सोपान पाटील तपास करत आहेत.