जळगाव समाचार | २८ फेब्रुवारी २०२६
शहरातील नेब कॉलनी परिसरात रविवारी मध्यरात्री किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात एका ४२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास आनंद नगरला लागून असलेल्या नेब कॉलनी भागात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकारे (वय ४२, रा. नेब कॉलनी, भुसावळ) यांचा परिसरातील एका व्यक्तीशी किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर बाचाबाची आणि हाणामारीत झाले. दरम्यान, संबंधित व्यक्तीने संतापाच्या भरात सावकारे यांच्या डोक्यात सिमेंटची कुंडी फेकून मारल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
या प्रहारात अनिल सावकारे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे नेब कॉलनी तसेच आनंद नगर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, मृत अनिल सावकारे यांच्या कुटुंबीयांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत संबंधित आरोपीस तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. भुसावळ शहरात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

![]()




