जळगाव समाचार | २१ मार्च २०२५
भुसावळ शहरातील कुख्यात गुंड मुकेश भालेराव याची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह पुरून टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मुकेश भालेराव (वय ३१, रा. टेक्निकल हायस्कूल मागे, भुसावळ) याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारहाण, लूट, धमकी आणि खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. प्रशासनाने यापूर्वी त्याला नाशिक येथे स्थानबद्ध केले होते, मात्र बाहेर आल्यानंतर तो पुन्हा भुसावळमध्ये वास्तव्यास होता.
चार दिवसांपूर्वी काही तरुण त्याला घरातून घेऊन गेले होते, त्यानंतर तो बेपत्ता झाला. त्याचा शोध घेऊनही तो आढळून न आल्याने अखेर त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
दरम्यान, आज (२१ मार्च) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तापी नदीच्या किनारी त्याचा मृतदेह पुरलेला आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला.
सध्या शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला असून, शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुकेश भालेराव आणि त्याच्या टोळीवर तब्बल २६ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.