जळगाव समाचार डेस्क| १४ सप्टेंबर २०२४
भुसावळ शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्या दुहेरी हत्याकांडातील प्रमुख आरोपी नितीन पथरोड याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा गुन्हा २९ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास जुना सातारा रोडवर घडला होता, जेव्हा काही हल्लेखोरांनी त्यांची कार अडवून गोळीबार केला होता. या घटनेत संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांचा जागीच मृत्यू झाला होता, ज्यामुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली होती.
या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आले आहे, तर इतर काही मारेकरी अजूनही फरार आहेत. प्रमुख आरोपी नितीन पथरोड याला अटक केल्यानंतर नंदुरबार कारागृहात हलविण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याची प्रकृती खालावल्याने त्याच्यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. काल रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती नंदुरबार पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.
भुसावळ शहरात या घटनेमुळे पुन्हा एकदा वातावरण तणावपूर्ण झाले आहे.