जळगाव समाचार| शनिवार, २२ मार्च २०२५
भुसावळ शहरातील हद्दपार गुन्हेगार मुकेश भालेराव याचा खून करून त्याचे शव तापी नदीच्या किनारी फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यामध्ये दोन महिला आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यामध्ये भालेरावच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
मुकेश प्रकाश भालेराव (वय 31, रा. टेक्निकल हायस्कूल मागे, भुसावळ) हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारहाण, लुटमार, धमकी, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल होते. पोलिसांनी त्याला नाशिक येथे स्थानबद्ध केले होते, तसेच भुसावळ शहरातून हद्दपार केले होते. मात्र, होळीच्या दिवशी रात्री तो भुसावळमधील आपल्या घरी परत आला होता.
मुकेश भालेरावच्या दुसऱ्या पत्नीला १७ वर्षांची एक मुलगी आहे. पोलिस तपासात असे निष्पन्न झाले की, मुकेशने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. या कारणावरून त्याचा राहत्या घरातच खून करण्यात आला. त्यानंतर शव तापी नदीच्या किनारी टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या खून प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये दोन महिला आणि दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. पोलीस उपअधीक्षक (डी. वाय. एस. पी.) कृष्णांत पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

![]()




