जळगाव समाचार | १२ डिसेंबर २०२५
मध्य रेल्वेच्या भुसावळ–मुंबई मार्गावर लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांची संख्या वाढली असली तरी, करोना काळापासून बंद असलेली ५११५४/५११५३ भुसावळ–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पॅसेंजर गाडी अजून सुरू झालेली नाही. या गाडीच्या पुर्नप्रारंभाची प्रतीक्षा जिल्ह्यातील प्रवाशांना लागली आहे. कारण, एक्सप्रेस गाड्या लहान स्थानकांवर थांबत नसल्याने भुसावळ–नाशिक–मुंबई दिशेला जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या स्थानकांवर धावावे लागते.
सध्या भुसावळ–इगतपुरी आणि भुसावळ–देवळाली या दोनच मेमू गाड्या उपलब्ध आहेत. मात्र, त्या मर्यादित अंतरावर धावतात आणि लांबच्या प्रवासासाठी पर्याय उपलब्ध होत नाही. लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये गर्दी प्रचंड असल्याने प्रवाशांना जागा न मिळाल्यास सहा ते सात तास उभ्याने प्रवास करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पूर्वीप्रमाणे थांबा असलेली पॅसेंजर गाडी हाच सर्वात सोयीस्कर पर्याय ठरतो.
करोना पूर्व काळात भुसावळहून सकाळी ०७.०५ वाजता सुटणारी ही पॅसेंजर गाडी महाराष्ट्रातील तब्बल ४७ स्थानकांवर थांबत असे. भादली, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, निफाड, नाशिक रोड, देवळाली, इगतपुरी, कसारा, कल्याण, ठाणे, दादर अशा लहान–मोठ्या स्थानकांवरून हजारो प्रवाशांचा प्रवास ती सुलभ करीत असे. वेग कमी असला—फक्त ३७ किमी प्रतितास—तरी कमी भाडे (७०–८० रुपये) आणि जास्त थांबे यामुळे ही गाडी सामान्य प्रवाशांची ‘लाईफलाईन’ होती.
भुसावळ–मुंबई पॅसेंजर बंद झाल्याने केवळ प्रवाशांचे हाल वाढले नाहीत, तर स्थानिक मागणीही दिवसेंदिवस तीव्र होत आहे. जळगाव–मनमाड तिसऱ्या मार्गाची चाचणी पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर मेमू किंवा पॅसेंजर गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, लोकप्रतिनिधींकडून ठोस पाठपुरावा न झाल्यानं प्रवाशांची प्रतीक्षा अजूनही कायम आहे.

![]()




