भुसावळात लुटीच्या प्रयत्नात व्यावसायिकावर गोळीबार; एक जण गंभीर जखमी

 

जळगाव समाचार | १८ डिसेंबर २०२५

जिल्ह्यातील भुसावळ शहरात बुधवारी रात्री लुटीच्या उद्देशाने दुचाकींवर आलेल्या चौघा अज्ञातांनी एका व्यावसायिकावर जवळून गोळीबार केल्याची गंभीर घटना घडली. या गोळीबारात उल्हास गणेश पाटील (वय ३९, रा. जुना सातारा, भुसावळ) हे गंभीर जखमी झाले आहेत. एक गोळी त्यांच्या छातीत घुसल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी जळगाव येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

भुसावळ शहरातील जळगाव रस्त्यावरील जुना सातारा भागात उल्हास पाटील हे टपरी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकींवर आलेले चार जण तोंडाला रूमाल बांधून त्यांच्या टपरीसमोर थांबले व पैसे लुटण्याचा प्रयत्न करू लागले. परिस्थिती ओळखून पाटील यांनी जोरदार प्रतिकार केला. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी जवळील धारदार वस्तूने हल्लेखोरांवर वार केल्याने चिडलेल्या लुटारूंनी त्यांच्यावर जवळून गोळीबार केला. त्यातील एक गोळी छातीत लागल्याने पाटील रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

लुटीचा प्रयत्न फसल्यानंतर चौघेही हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून आवश्यक नमुने गोळा करत तपास सुरू केला असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अलीकडील काळात शहरात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक व व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here