प्रेमविवाहाचा रागातून भुसावळात तरुणावर अमानुष अत्याचार, काढली नग्न धिंड…


जळगाव समाचार | २२ मार्च २०२६

प्रेमविवाह केल्याच्या संतापातून एका २५ वर्षीय तरुणावर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील खडका येथे उघडकीस आली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाला खांबाला बांधून बेदम मारहाण केली, त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याची गावातून नग्न अवस्थेत धिंड काढल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

पीडित चेतन दिलीप जंगले (वय २५, रा. खडका) याने काही दिवसांपूर्वी भुसावळ शहरातील १८ वर्षीय तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. या विवाहाला मुलीच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. याच रागातून सूड उगवण्यासाठी मुलीच्या नातेवाईकांनी हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. घटनेच्या वेळी चेतन हा आपल्या पत्नीसह भुसावळ शहरातील सुहास हॉटेल परिसरात राहणाऱ्या मामा संतोष महाजन यांच्या घरी थांबला होता. त्याच वेळी मुलीचे काका, मावशी आणि इतर नातेवाईकांसह सुमारे दहा ते बारा जणांचा गट तेथे दाखल झाला.

संशयितांनी घरात घुसून शिवीगाळ करत धमकावले आणि चेतनवर मुलीला फूस लावल्याचा आरोप करत त्याच्या पत्नीला जबरदस्तीने बाहेर ओढले. प्रसंगी तिच्यावरही मारहाण करण्यात आली. त्यानंतर चेतनला पकडून खांबाला बांधण्यात आले आणि त्याचा गळा रुमालाने आवळण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही काळ तो श्वास गुदमरल्याने बेशुद्ध होण्याच्या स्थितीत गेला होता. दरम्यान, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र संशयितांनी पाठलाग करून त्याला पुन्हा पकडले.

यानंतर संशयितांनी चेतनला ओढत दूध डेअरी परिसरात नेले. तेथे सार्वजनिक ठिकाणी त्याचे कपडे फाडून त्याला नग्न करण्यात आले आणि लाथाबुक्क्यांनी तसेच काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या वेळी “मुलीला सोडून दे” असा दबाव टाकत त्याच्याकडून जबरदस्तीने कबुली घेतल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्याला दुचाकीवर बसवून खडका गावात आणले आणि बसस्थानकापासून घरापर्यंत नग्न अवस्थेत चालण्यास भाग पाडत त्याची धिंड काढली.

या दरम्यान आरोपींनी चेतनच्या कुटुंबीयांनाही धमकावले. त्याच्या आई-वडिलांना तसेच बहिणीच्या पतीलाही शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. घर जाळण्याच्या धमक्या देत परिसरात दहशत निर्माण करण्यात आली. अखेर स्थानिक नागरिकांनी धाडस करून हस्तक्षेप केल्यामुळे चेतनची सुटका करण्यात यश आले. या घटनेत चेतनचा हात मोडला असून शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला तत्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पीडिताच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोमल पाटील, हेरंब चौधरी, संजय बढे, विजय पाटील आणि ज्ञानेश्वर भोई या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर संशयित फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली असून घटनेचा सखोल तपास केला जात आहे.

या घटनेमुळे भुसावळ व परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रेमविवाहाच्या कारणावरून तरुणावर झालेल्या या अमानुष अत्याचारामुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सामाजिक स्तरावरही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here