जळगाव समाचार | १२ नोव्हेंबर २०२५
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव आणि भुसावळ पोलीसांनी संयुक्तरित्या पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर कोंबिंग ऑपरेशन राबवले. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशावरून आणि अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली ११ नोव्हेंबर रोजी सकाळी तीन ते सात या वेळेत ही मोहीम पार पडली. या ऑपरेशनमध्ये हिस्ट्रीशीटर, हद्दपार, फरार आणि वॉरंटधारक आरोपींवर लक्ष केंद्रित करत शेकडो ठिकाणी पोलिसांनी सर्च ऑपरेशन केले.
या कारवाईदरम्यान महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अंतर्गत दोन हद्दपार आरोपींवर, कलम १२२ अंतर्गत दोन जणांवर आणि आर्म्स ॲक्ट ४/२५ अंतर्गत एकावर कारवाई करण्यात आली. याशिवाय ९ नॉन बेलबल वॉरंट, १० बेलबल वॉरंट तसेच तब्बल ७२ समन्स बजावण्यात आले. ५६ हिस्ट्रीशीटर, ९ हद्दपार आणि ९० रेकॉर्डवरील संशयित आरोपींची चौकशी करण्यात आली. कारवाईदरम्यान भुसावळ रेल्वेतील मोबाईल चोरीच्या दोन गुन्ह्यांमध्ये फरार असलेला सादिक अली नियाज अली हा आरोपी सापडला असून त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पाहिजे असलेली आरोपी मरियम हिचाही पोलिसांनी शोध लावून तिला ताब्यात घेतले.
ही संपूर्ण मोहीम उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, भुसावळ शहरचे निरीक्षक उद्धव डमाळे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ७५ अंमलदार आणि ६ अधिकारी सहभागी झाले. पोलिस मुख्यालयातून आलेल्या चार आरसीपी पथकांनीही कारवाईत सक्रीय सहभाग नोंदवला. पहाटेच्या या आकस्मिक ऑपरेशनमुळे भुसावळ शहरात गुन्हेगारी जगतात एकच धसका बसला असून पोलिसांच्या दक्षतेमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या त्यांच्या बांधिलकीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

![]()




