मुक्ताईनगर – सततची होणारी नापिकी व कर्जामुळे
तालुक्यातील रिगांव येथील तरुण शेतकरी सुरेश ओंकार विटे (वय ४०) यांनी २ रोजी सकाळी स्वतःच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.
कुऱ्हा गावापासून जवळच असलेल्या रिगांव येथील तरुण शेतकरी सुरेश ओंकार विटे हे नेहमीप्रमाणे २ ऑक्टोंबरला सकाळी ८.३० वाजता आपल्या रिगांव शिवारातील शेतात गेले होते. शेतात जातांना त्यांनी जेवणाचा डबा सोबत नेला नव्हता. त्यामुळे त्यांचा मुलगा गौरव हा वडीलांचा जेवणाचा डबा शेतात घेऊन गेला. मात्र, गौरवला आपले वडील शेतातील झोपडीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळले. धावत घरी जावून हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांचे मोठे बंधू गणेश विटे यांनी तत्काळ शेताकडे धाव घेऊन भावाला मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करुन मयत घोषित केले. मयत सुरेश विटे यांच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे. . याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.