जळगाव समाचार डेस्क | २० सप्टेंबर २०२४
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या भांडे वाटप योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वाटप सुरू असलेली गृहपयोगी वस्तूंची वितरण प्रक्रिया गुरुवारी सकाळी अचानक बंद झाल्याने संतप्त कामगार महिलांनी मंगरूळजवळ अमळनेर-धुळे रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.
या प्रसंगी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ठेकेदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला. त्यामुळे सुराणा यांनी पोलिस निरीक्षकांशी संपर्क साधून ठेकेदारावर कायदा सुव्यवस्था बिघडवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.
प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी ठेकेदाराच्या अपुऱ्या नियोजनामुळे भांडे वाटप यंत्रणा कोलमडल्याचे सांगत जिल्हाधिकारी कार्यालयात अहवाल पाठवला. वाटपासाठी शेकडो लाभार्थ्यांना एकाच वेळी बोलावल्याने गोंधळ उडाल्याची माहिती दिली.
लाभार्थी तीन दिवसांपासून मंगरूळजवळील गोदामाजवळ थांबले होते, जिथे गृहपयोगी भांड्यांचा संच वाटप होत होता. पिण्याचे पाणी आणि इतर मुलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे लाभार्थ्यांची मोठी गैरसोय झाली होती.