भडगावमध्ये फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट; हॉटेल मालकासह १३ जण जखमी…

 

जळगाव समाचार | १५ सप्टेंबर २०२५

भडगाव येथील पारोळा चौफुलीवरील एका चहाच्या हॉटेलमध्ये रविवारी दुपारनंतर अचानक फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन हॉटेल मालकासह १३ जण जखमी झाले. स्फोट इतका भीषण होता की परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार, फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला आणि ग्राहकांसह हॉटेल मालक व त्याचा मुलगा यांचा यात समावेश असलेल्या अनेक जणांचा होरपळून जखमी झाले.

जखमींमध्ये हॉटेल मालक शेख रफिक शेख रज्जाक (वय ५०, ग्रीन पार्क कॉलनी, भडगाव), त्यांचा मुलगा सोहिल शेख रफिक मणियार (वय २८, ग्रीन पार्क कॉलनी, भडगाव), ग. स. सोसायटीचे माजी उपाध्यक्ष रवींद्र मुकुंदराव सोनवणे (वय ५६, बाळद रोड, भडगाव), इकबाल शेख गनी (वय ४०, गंजी वाडा, भडगाव), एजाजोद्दीन रियाजद्दीन मुल्ला (वय ३२, जलाली मोहल्ला, भडगाव), मोहसीन शेख शब्बीर (वय ३३, ग्रीन पार्क कॉलनी, भडगाव), दिलीप भटा ठाकरे (वय ६०, साईनगर, भडगाव), भूषण प्रकाश पाटील (वय ३४, जुवार्डी, ता. भडगाव), राजकुमार मोतीराम पवार (वय २८, बिदर, कर्नाटक), मयूर पदमसिंग पाटील (वय २८, वडधे, ता. भडगाव), राहुल बापू पाटील (वय ४०, जामदे, ता. चाळीसगाव), अमोल गोविंद शिंदे (वय ३४, वळूज, जि. सातारा) आणि गजानन दिगंबर उजेड (वय २८, वडगाव, ता. जालना) यांचा समावेश आहे.

जखमींना तातडीने भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पाचोरा, जळगाव आणि धुळे येथील खासगी व शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णवाहिका चालक निळू पाटील, भैया पाटील, सागर पाटील आणि गोलू शिंदे यांनी वेळीच जखमींना उपचारासाठी पोहोचवून महत्त्वाची मदत केली. त्यांच्या तत्परतेमुळे अनेकांचे प्राण वाचल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

घटनास्थळी आमदार किशोर पाटील यांनी भेट देऊन जखमींना दिल्या जाणाऱ्या उपचाराची माहिती घेतली. तसेच नातेवाईकांशी संवाद साधून प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी हमी दिली. गंभीर जखमींना आवश्यक उपचार आणि शासकीय योजना तातडीने लागू करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले. पोलिसांनी स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला असून परिसरातील नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here