जळगाव समाचार | १७ मार्च २०२५
बीड शहरातील स्वराज नगर भागात कृष्ण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या बाहेर एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धनंजय नागरगोजे असे मृत शिक्षकाचे नाव असून, ते कोळगाव येथील कायम विनाअनुदानित आश्रमशाळेत कार्यरत होते. त्यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली असून, यात त्यांनी काही लोकांवर छळ केल्याचा आरोप केला आहे.
धनंजय नागरगोजे यांनी आपल्या तीन वर्षांच्या मुलीसाठी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर, मी माफी मागायच्या लायकीचाही नाही.” याशिवाय त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे तसेच उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड आणि ज्ञानेश्र्वर रजेभाऊ मुरकुटे यांची नावे घेतली आहेत. या सर्वांनी आपला छळ केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
धनंजय नागरगोजे यांनी १८ वर्षांपासून विनाअनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम केले होते. मात्र, पगार न मिळाल्याने त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाकडे विचारणा केली होती. त्यावर “तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि आम्ही तुझ्या जागी दुसरा कर्मचारी नेमू,” असे उत्तर मिळाल्याचा दावा त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
संस्थाचालकांची प्रतिक्रिया
या घटनेवर शाळेचे संस्थाचालक विजय विक्रम मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “शिक्षकांना पगारासाठी अनुदान मिळायला हवे. मागील १५ वर्षांपासून अनुदान न मिळाल्याने शिक्षकांना मोठे आर्थिक संकट सहन करावे लागत आहे. सरकारने जर योग्य वेळी अनुदान दिले असते, तर आज ही दुर्दैवी घटना घडली नसती.”
या घटनेमुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच्या शिक्षण व्यवस्थेतील अनुदानाच्या समस्येवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला गेला आहे. संबंधित प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.