जळगाव समाचार डेस्क | ३१ डिसेंबर २०२४
बीडच्या खंडणी प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड अखेर पुण्यात सीआयडीकडे शरण आला आहे. शरणागती पत्करल्यावर सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून, त्याला लवकरच कोर्टात हजर केले जाईल.
वाल्मिकने शरणागती पत्करण्यापूर्वी एक व्हिडीओ शेअर करून दावा केला आहे की, त्याचा संतोष देशमुख हत्येप्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्याने सांगितले की, “राजकीय कारणांसाठी माझं नाव उचललं जात आहे. जर मी दोषी असेल, तर मला शिक्षा द्यावी.”
दरम्यान, वाल्मिक कराडवर खंडणीसह इतर गंभीर आरोप आहेत आणि त्याच्यावर संतोष देशमुख हत्येचा आरोप देखील होऊ शकतो, असं बोललं जात आहे. विरोधकांनी त्याला हत्येचा आरोपी ठरवून त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सीआयडीने 9 पथकं तयार करून वाल्मिकचा शोध घेतला होता. तो कर्नाटक, उज्जैनसह इतर ठिकाणी लपून असल्याची माहिती होती, पण अखेर आज तो स्वतः सीआयडीकडे आला.
आता सीआयडी त्याच्यावर सखोल चौकशी करणार असून, पुढील तपासातून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.