जळगाव समाचार | २९ ऑगस्ट २०२५
आशिया कप 2025 च्या तोंडावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) मोठा बदल घडून आला आहे. बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, पुढील निवडणुकीपर्यंत उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडे कार्यवाहक अध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. अध्यक्षपदाची निवडणूक सप्टेंबर महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे.
बीसीसीआयच्या घटनेनुसार, 70 वर्षांचा टप्पा ओलांडल्यानंतर कोणत्याही अधिकाऱ्याला आपले पद सोडणे बंधनकारक ठरते. रॉजर बिन्नी या वयोमर्यादेत शिरल्याने ते या पदावर कायम राहण्यास अपात्र ठरले आहेत. त्यामुळे राजीव शुक्ला काही महिन्यांसाठी कार्यवाहक अध्यक्षपद सांभाळणार असून, नवीन अध्यक्षाची निवड होईपर्यंत तेच जबाबदारी पार पाडतील. 2020 पासून ते बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
बुधवारी झालेल्या बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत राजीव शुक्ला यांची कार्यवाहक अध्यक्ष म्हणून निवड झाली. या बैठकीत टीम इंडियासाठी नवीन मुख्य प्रायोजक निश्चित करणे हा प्रमुख मुद्दा चर्चेत होता. ड्रीम-11ने माघार घेतल्यानंतर 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कपपूर्वी प्रायोजक निश्चित करणे हे बीसीसीआयसाठी मोठे आव्हान बनले आहे.
रॉजर बिन्नी हे 1983 साली एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील महत्त्वाचे सदस्य होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 27 कसोटी सामन्यांत 47 बळी मिळवले असून, दोन वेळा पाच बळींची कामगिरी केली आहे. 72 एकदिवसीय सामन्यांत त्यांनी 77 बळी घेतले. 2022 मध्ये त्यांनी सौरव गांगुली यांच्या पाठोपाठ बीसीसीआय अध्यक्षपद स्वीकारले. गांगुली यांनी 2019 ते 2022 या कालावधीत अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. बीसीसीआयची जबाबदारी सांभाळणारे बिन्नी हे भारताचे तिसरे माजी क्रिकेटपटू ठरले.