जळगाव समाचार | २२ मे २०२५
जळगाव शहरात सध्या राज्य सरकारच्या “भांडी वाटप योजनेत” मोठा गैरव्यवहार उघड झाला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाद्वारे राबविण्यात येणाऱ्या या योजनेत पात्र बांधकाम कामगारांना 30 वस्तूंचा घरगुती भांड्यांचा सेट मोफत दिला जातो. मात्र, या योजनेत लाभ मिळवण्यासाठी काही कामगारांकडून ८०० ते १ हजार रुपयांची मागणी होत असल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे, ही लूट काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शहरात भांडी वाटपासाठी कोणतेही अधिकृत केंद्र नसताना, काही ठेकेदारांचे कामगार लाभार्थ्यांना फोन करून पैसे मागतात आणि नंतर घरपोच भांडी देतात. त्यामुळे कामगारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे.
यापूर्वी भांड्यांचे वाटप शहराजवळील एका ठिकाणी मोफत केले जात होते, पण आता कोणतेही अधिकृत वाटप केंद्र कार्यरत नसल्याचे दिसते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात राजकीय नेते, त्यांचे कार्यकर्ते व ठेकेदार यांच्यातील संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
यासंदर्भात विचारणा केली असता, सहाय्यक आयुक्तांनी योग्य पुरावे मिळाल्यानंतरच कारवाई करू, असे सांगितले आहे.
राजकीय नेते आणि ठेकेदारांची चांदी, पण गोरगरीब कामगार आर्थिक संकटात!
या प्रकारामुळे गरजू लाभार्थ्यांना आर्थिक फटका बसत असून, सरकारच्या योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचत नाही, ही बाब धक्कादायक आहे.