जळगाव समाचार | ८ सप्टेंबर २०२५
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादनासाठी रावेर बाजार समिती देशभरात प्रसिद्ध असली तरी सध्या शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. रक्षाबंधनापूर्वी केळीचा दर क्विंटलमागे दोन हजार रुपये होता, तो आता १२०० रुपयांपर्यंत घसरला आहे. यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे ८०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत असून, ऑगस्ट महिन्यात बाजार समितीची उलाढाल सुमारे ५० कोटींनी घटून केवळ १०० कोटी रुपयांवर आली आहे.
रावेरसह जळगाव आणि चोपडा बाजार समित्या दररोज केळीचे दर जाहीर करत असल्या तरी व्यापारी मात्र मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीने जाहीर केलेल्या दरांनुसार व्यवहार करतात. बऱ्हाणपूरमध्ये दर चढले किंवा घसरले तरी त्याचा परिणाम देशभरातील बाजारावर होतो. रावेरमध्ये वास्तववादी दर जाहीर होतात, तरीही व्यापारी बऱ्हाणपूरचा दरच ग्राह्य मानत असल्याने शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, बाजार समितीच्या आर्थिक उलाढालीवरही त्याचा गंभीर परिणाम झाला आहे.
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अर्थसंकल्प व सांख्यिकी संचालनालयाच्या मदतीने रावेर बाजार समितीतील व्यापाराचा अभ्यास केला. त्यानुसार २०२३ ते २०२५ या कालावधीत सुमारे ९६ हजार ट्रक केळीची आवक झाली असून १८०० कोटींहून अधिक उलाढाल झाली आहे. मात्र, मे ते जुलै २०२५ या कालावधीत सरासरी ४५२ कोटींची उलाढाल झाली असताना, दर घसरल्याने ऑगस्टमध्ये ती केवळ १०० कोटींपर्यंत आली. प्रशासन जागतिक बाजारपेठेत जळगावच्या केळीला योग्य दर मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.