जळगाव समाचार | २१ जानेवारी २०२६
बालकलावंतांना घडविणारी व त्यांच्या सुप्त कलागुणांना दिशा देणारी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा ही देशातील बालकलावंतांसाठी चालणारी एकमेव सांस्कृतिक चळवळ आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत गेल्या २१ वर्षांपासून सातत्याने ही स्पर्धा आयोजित केली जात असून, बालरंगभूमीच्या विकासात या उपक्रमाने मोलाची भूमिका बजावली आहे, असे प्रतिपादन बालरंगभूमी परिषद (मध्यवर्ती) मुंबईचे प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल यांनी केले.
शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात मंगळवारी (दि. २०) २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले. या वेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. १९७९ साली जळगाव जिल्ह्यात पहिले बालनाट्य सादर करणारे ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बालनाट्य करत मोठा झालेला बालकलावंत आज या स्पर्धेचा उद्घाटक ठरतो, ही बालरंगभूमीच्या प्रवासातील महत्त्वाची घटना आहे. आज प्रेक्षकात बसलेला बालप्रेक्षक उद्या या स्पर्धेचा उद्घाटक होईल, तेव्हाच या स्पर्धेचे खरे यश सिद्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.
उद्घाटन सोहळ्यास हास्यजत्रा फेम अभिनेते हेमंत पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, प्रा. राजेंद्र देशमुख, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्या गीतांजली ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच परीक्षक म्हणून डॉ. अमजद सैय्यद (बीड), वनिता जीवने (नागपूर), प्रा. प्रदीप कांबळे (छत्रपती संभाजीनगर) उपस्थित होते. स्पर्धेचे समन्वयक प्रा. संदीप तायडे, सहसमन्वयक नितीन तायडे, सुभाष गोपाळ आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते.
नटराजपूजन व दीपप्रज्वलनानंतर घंटानाद करून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी नेवे यांनी केले, तर आभार नितीन तायडे यांनी मानले.
जळगाव जिल्ह्यातील एकूण ४३ संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून, दि. २० ते २५ जानेवारी या कालावधीत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सहा बालनाट्यांचे सादरीकरण होणार आहे. या बालनाट्यांचा आस्वाद बालकलावंत, पालक व शिक्षकांनी घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे तसेच समन्वयक प्रा. संदीप तायडे यांनी केले आहे.

![]()




