जळगाव समाचार | २८ मार्च २०२५
यावल तालुक्यातील दहिगाव येथे होणारा बालविवाह वेळीच रोखण्यात आला. महिला व बालविकास विभागाच्या तत्परतेमुळे ही कारवाई यशस्वी झाली.
महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांना सकाळी 9:45 वाजता बालविवाहाची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ चौकशी केली असता, मुलगा आणि मुलगी दोघेही अल्पवयीन असल्याचे समोर आले. त्यामुळे हा विवाह थांबवण्यात आला.
यावल पोलिसांनी संबंधितांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती दिली. त्यानंतर मुलगा आणि मुलीला बाल न्याय संरक्षण अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. मुलीला जळगाव येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले.
या कारवाईत आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेरच्या ‘बालविवाह मुक्त भारत’ उपक्रमाचे अशोक तायडे यांनी सहकार्य केले.
बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन अर्चना आटोळे यांनी केले आहे.

![]()




