आक्षेपार्ह विधान प्रकरणी पोलीस निरीक्षक बकाले सेवेतून बडतर्फ; पोलीस महासंचालकांचा आदेश…

 

जळगाव समाचार | २४ सप्टेंबर २०२५

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी याबाबत आदेश जारी केले. अधिनस्त कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवर बोलताना बकाले यांनी मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.

या प्रकरणी छत्रपती शिवाजी ब्रिगेड, रयत सेना, संभाजी ब्रिगेड यांसह विविध संघटनांनी तीव्र आंदोलने छेडून बडतर्फीची मागणी केली होती. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या चौकशीत बकाले यांच्यावर कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांना समक्ष सुनावणीची संधी देण्यात आली, मात्र नवे मुद्दे मांडण्यात अपयश आल्याने अखेर सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कारवाई शक्य झाली. छत्रपती शिवाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून हा मराठा समाजाच्या एकजुटीचा तसेच सामाजिक न्यायासाठीच्या संघर्षाचा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here