खुर्ची नव्हे भक्ती महत्त्वाची; बहिणाबाई महोत्सवात राजू मामांचा आदर्श

 

जळगाव समाचार | २७ जानेवारी २०२६

जळगाव शहरात भरारी फाउंडेशन व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहिणाबाई महोत्सव सध्या अंतिम टप्प्यात सुरू आहे. या महोत्सवाअंतर्गत प्रजासत्ताक दिनी (दि. २६ जानेवारी) सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. रविकिरण महाराज यांच्या उपस्थितीत कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कीर्तनाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

कीर्तनादरम्यान तुफान गर्दी झाल्यामुळे शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांना बसण्यासाठी खुर्ची उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र यामुळे कोणतीही नाराजी न दाखवता राजू मामांनी थेट जमिनीवर बसून, हात जोडून अत्यंत श्रद्धेने कीर्तनाचा आस्वाद घेतला. आमदार असूनही कोणत्याही विशेष सुविधेची अपेक्षा न ठेवता त्यांनी सर्वसामान्य भाविकांप्रमाणे कीर्तन ऐकण्यास प्राधान्य दिले.

राजू मामांच्या या कृतीमुळे उपस्थितांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. खुर्ची किंवा मानमरातबापेक्षा भक्ती, नम्रता व साधेपणाला प्राधान्य देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची प्रतिमा अधिक ठळकपणे समोर आली. ‘डाऊन टू अर्थ’ स्वभाव, आपुलकी व साधेपणाची जाणीव करून देणारी ही घटना अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली असून, राजू मामांच्या साध्या आणि माणुसकीच्या नेतृत्वाची प्रचिती पुन्हा एकदा जळगावकरांना आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here