जळगाव समाचार | २३ जानेवारी २०२६
भरारी बहुउद्देशीय संस्था व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बहिणाबाई महोत्सवास शुक्रवारी उत्साहात प्रारंभ झाला. महोत्सवाचे उद्घाटन बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात खान्देशातील विविध लोककला, सत्यनारायण बाबा मौर्य यांची भारत माता की आरती, ह. भ. प. रविकिरण महाराज यांचे कीर्तन, देशभक्तीपर गीते, वहीगायन, भावगीते, मराठी संस्कृतीवर आधारित फॅशन शो तसेच शालेय व महाविद्यालयीन कलावंतांचे सादरीकरण होणार आहे. यासोबतच खाद्यपदार्थ व गृहपयोगी वस्तूंचे विविध स्टॉल्सही उभारण्यात आले असून पहिल्याच दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी खेळ पैठणीचा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व मेहंदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी चैत्राम पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. खासदार स्मिता वाघ यांनी बहिणाबाई महोत्सवाच्या ११व्या पर्वाला शुभेच्छा दिल्या. विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्थानिक कलाकारांनी आपल्या कलेच्या सादरीकरणातून प्रेक्षकांची दाद मिळवली.
महोत्सवाच्या निमित्ताने उद्योग व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल उद्योगपती पुखराज पगारीया व निळकंठ गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल प्राचार्य मानसी गगडाणी यांना बहिणाबाई पुरस्काराने गौरविण्यात आले. उद्यापासून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना बहिणाबाई पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
यावेळी आमदार सुरेश भोळे, खासदार स्मिता वाघ, उद्योगपती रजनीकांत कोठारी, माजी आमदार मनिष जैन, अनिकेत पाटील, अनिश शहा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षा संगीता पाटील, दीपक सराफ, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, श्रीराम पाटील, डॉ. पी. आर. चौधरी, शैलेश मोरखडे, नगरसेवक दीपक सूर्यवंशी, जयश्री राहुल पाटील, माधुरी बारी, दीपक जोशी, सागर पगारीया, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, विक्रांत चौधरी, पवन जैन, सागर परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ढगे व डॉ. राजेंद्र देशमुख यांनी केले, तर प्रास्ताविक दीपक परदेशी यांनी मांडले.

![]()




