आजपासून जळगावमध्ये बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन; सांस्कृतिक कार्यक्रमांचे आकर्षण…

जळगाव समाचार डेस्क | २३ जानेवारी २०२५

भरारी फाउंडेशनतर्फे २३ ते २७ जानेवारी दरम्यान जळगावमधील सागर पार्क मैदानावर बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा महोत्सवाचे १० वे वर्ष असून, सांस्कृतिक आणि मनोरंजन कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या महोत्सवाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

महोत्सवाचा शुभारंभ २३ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता अपर पोलीस महासंचालक, कारागृह व सुधारसेवा डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सोहळ्याला खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे आणि मंगेश चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, उद्योगपती रजनीकांत कोठारी, तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख आकर्षणे
• खानदेशातील पर्यटन स्थळांची माहिती देणारे विशेष दालन.
• वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारे भव्य पुस्तकाच्या प्रतिकृतीचे प्रवेशद्वार.

पाच दिवसांचे कार्यक्रम
१. २३ जानेवारी
• भारुडं प्रबोधन
• शालेय सांस्कृतिक कार्यक्रम
• जागर लोककला
• विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा

२. २४ जानेवारी
• अभिनेत्री श्रेया बुबडे आणि अभिनेते कुशल बद्रीके यांचा ‘चला हवा करुया’ कार्यक्रम

३. २५ जानेवारी
• ‘सप्तरंगी रे’ शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण
• मराठी संस्कृतीवर आधारित फॅशन शो

४. २६ जानेवारी
• शाहीर मीरा दळवी यांचा ‘लावणी महाराष्ट्राची’ कार्यक्रम

५. २७ जानेवारी
• शाहीर सुमित दळवी यांचा ‘शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण’ कार्यक्रम

खाद्यपदार्थांची मेजवानी
या महोत्सवात खानदेशातील पारंपरिक आणि विविध खाद्यपदार्थांची मेजवानीही जळगावकर नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे.

बहिणाबाई महोत्सवामुळे जळगावच्या सांस्कृतिक जीवनात नवा रंग भरला आहे. नागरिकांनी या महोत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमांचा आणि खाद्यपदार्थांचा आनंद घ्यावा, असे आयोजकांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here