बहिणाबाई महोत्सव समाजप्रेरणादायी उपक्रम; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे गौरवोद्गार देशभक्त सत्यनारायण बाबा मौर्य यांच्या प्रबोधनाने कार्यक्रमाला वैचारिक उंची

 

जळगाव समाचार | २६ जानेवारी २०२६

भरारी फाउंडेशनतर्फे आयोजित बहिणाबाई महोत्सवाच्या संध्याकाळच्या सत्रात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. अशा सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांमधून समाजात सकारात्मक परिवर्तन घडते, असे त्यांनी नमूद केले. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याची ही परंपरा प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. या प्रसंगी रजनीकांत कोठारी, माजी आमदार मनीष जैन, निर्णय चौधरी, गोसेवक अजय ललवाणी, अनिल कांकरिया आणि रवींद्र लड्डा यांची प्रमुख उपस्थिती होती.

समाजसेवा तसेच आपापल्या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल बहिणाबाई गौरव पुरस्काराने नंदलाल गादीया, राजेंद्र देशमुख, किशोर ढाके, सरिता खाचणे, भारती काळे, वसंत पाटील, डॉ. निलेश चांडक आणि किरण बच्छाव यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी आपल्या खुमासदार शैलीत करत उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण देशभक्त सत्यनारायण बाबा मौर्य यांचे प्रबोधनपर संबोधन ठरले. त्यांनी आपल्या प्रखर विचारांनी व देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांमध्ये नवा उत्साह निर्माण केला. भारतीय परंपरा, संस्कृती जपण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी सकस आहार, व्यायाम आणि उत्तम जीवनशैलीचे महत्त्व विशद केले. गंगा नदीच्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करत पर्यावरण संवर्धनाचे आवाहन केले. सीमेवरील सैनिक, महापुरुषांचे विचार आणि गोवंश संवर्धनाबाबत कृतज्ञतेची भावना ठेवण्याचा संदेश त्यांनी दिला. या उपक्रमाला जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here