बाफना ज्वेलर्स चोरी प्रकरणी आंतरराज्यीय आरोपी जेरबंद; वितळवलेली सोन्याची ‘लगड’ हस्तगत…

 

जळगाव समाचार | २६ जानेवारी २०२६

जळगाव शहरातील सुभाष चौक परिसरातील प्रतिष्ठित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स (नयनतारा अँड सन्स) येथे ग्राहकाच्या बहाण्याने येऊन सोन्याची साखळी चोरणाऱ्या सराईत आंतरराज्यीय आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी घडलेल्या या घटनेत आरोपीने सेल्समनला बोलण्यात गुंतवून १९.३५० ग्रॅम वजनाची (अंदाजे किंमत २ लाख ४९ हजार ६१५ रुपये) सोन्याची साखळी चोरून नेली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी तेलंगणा राज्यातील सायबराबाद परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने तेथे सापळा रचून भास्कर किसन बानोथ (वय २२, रा. नगाई पल्ली तांडा, जि. यदाद्री भुवनागिरी, तेलंगणा) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपीने चोरीची साखळी वितळवून ओळख टाळण्यासाठी तिची सोन्याची लगड तयार केल्याची कबुली दिली, ती लगड पोलिसांनी हस्तगत केली असून शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अटक केलेल्या आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी शनिपेठ पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले व पोलीस हवालदार बोरसे करीत आहेत. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलीस हवालदार प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर व चापो. महेश सोमवंशी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here