बदलापूर अत्याचार प्रकरणात त्या शाळेच्या ट्रस्टींना अखेर अटक…

जळगाव समाचार डेस्क | ३ ऑक्टोबर २०२४

बदलापूरातील शाळेत घडलेल्या चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात अखेर एक महिन्यानंतर पोलिसांनी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना कर्जत परिसरातून अटक केली. या दोघांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जास नकार दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

ऑगस्ट महिन्यात बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी पोलिसांना वेळेत माहिती न दिल्यामुळे त्यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच हे दोघेही पसार झाले होते. त्यांनी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात केलेला अर्जही १ ऑक्टोबर रोजी फेटाळण्यात आला.

मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत, महिनाभर उलटूनही आरोपींना पकडण्यात पोलिस अपयशी ठरल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यानंतर पोलिसांनी कर्जत परिसरातून या दोघांना अटक केली. आरोपींना उल्हासनगरच्या एसीपी कार्यालयात आणल्यानंतर मध्यरात्री त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.

वैद्यकीय तपासणीदरम्यान पत्रकारांना चकवा देण्यासाठी पोलिसांनी डमी आरोपींचा वापर केला. उदय कोतवाल यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयातच ठेवण्यात आले, तर तुषार आपटे यांची रवानगी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here