जळगाव समाचार | २२ ऑगस्ट २०२५
देशभरात वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अजनाड गावातील रूपाली मुकेश तायडे या महिलेने गावातील अनेक महिलांशी विश्वासाचे नाते जोडले व त्यांच्याकडून आधारकार्ड, फोटोसह महत्त्वाची कागदपत्रे गोळा केली. सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिने महिलांच्या नकळत त्यांच्या नावावर बोगस महिला बचत गट स्थापन केले. या गटांच्या माध्यमातून विविध सरकारी व खाजगी बँकांना फसवून तब्बल ६० ते ६५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले आणि ही संपूर्ण रक्कम स्वतःच्या खात्यात वळवून फरार झाली.
काही महिन्यांनंतर बँकांचे वसुली अधिकारी संबंधित महिलांच्या घरी हप्त्यांसाठी पोहोचले, तेव्हा हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला. आपण कोणतेही कर्ज घेतले नसताना आपल्या नावावर थकबाकी असल्याचे समजताच पीडित महिलांनी चौकशी केली आणि मोठ्या फसवणुकीचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी अजनाड येथील पीडित महिला प्रतिभा राजेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून रूपाली तायडे हिच्याविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.