जळगाव समाचार डेस्क | १३ ऑक्टोबर २०२४
मुंबईतील वांद्रे परिसरात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन राऊंड गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात सिद्दीकी जखमी झाले होते. बाबा सिद्दीकी यांना जवळच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
पण डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी खेरवाडी सिग्नलजवळील आमदार झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाकडे जात असताना त्यांच्यावर तीन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. यातील एक आरोपी हरियाणा तर दुसरा उत्तर प्रदेश इथला असल्याची माहिती आहे.
दरम्यान बाबा सिद्दिकी यांच्यावरील हल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
“बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या हल्ल्यासंदर्भात तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत. दोन आरोपी पकडण्यात आले आहेत.
एक हरियाणाचा आहे आणि एक उत्तर प्रदेशचा आहे. तिसरा आरोपी फरार आहे. त्याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यालाही लवकरच अटक केली जाईल,” असं शिंदे म्हणाले.
काही महिन्यांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांनी यांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांच्या मुलावर काँग्रेसने कारवाई केली होती. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हे आमदार असून मुंबई युवक काँग्रेसचं अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होती. पण आता काँग्रेसने त्यांना पदावरून हटवलं होतं. वडील बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. अशीही चर्चा आहे की झिशान सिद्दीकी सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहे.